इस्लामपूर (सांगली) : येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ला माजी ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे व आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. ‘बालशिक्षणाच्या चळवळीत सहज शिक्षण देताना " ‘मुक्तांगण’ इस्लामपूर शहराची वेगळी ओळख निर्माण करत आहे,’ असे मत अण्णा डांगे यांनी व्यक्त केले.
इस्लामपुरात गेल्या सहा वर्षांपासून चार वर्षांच्या आतील मुलांना ‘मुक्तांगण’मध्ये खेळातून शिक्षण दिले जाते. माजी मंत्री अण्णा डांगे व जयंत पाटील यांनी स्कूलला भेट देऊन पाहणी केली. विविध उपक्रम कसे राबविण्यात येतात, मुलांचे व्यक्तिमत्त्व कसे घडवले जाते, यावर त्यांनी चर्चा केली. अण्णा डांगे म्हणाले, ‘बालपण टिकवण्यासाठी ‘मुक्तांगण’ने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मुलांसाठी मुक्तांगण हे अनुभव व खेळघर आहे. बालकांच्या भावविश्वाचा विचार करून प्रत्येक कृती केली जाते.’
जयंत पाटील म्हणाले, ‘इस्लामपूर शहरात चांगल्या दर्जाचे प्ले स्कूल हवे होते. ती शहराची गरज ‘मुक्तांगण’ने पूर्ण केली आहे. आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी लहानपणी संस्कारांची गरज आहे. ‘मुक्तांगण’ने पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.’
स्कूलच्या अध्यक्षा सरोजिनी मोहिते यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. सचिव विनोद मोहिते यांनी आभार मानले.